रोगप्रतिकार शक्ती आणि होमिओपॅथिक औषधे
- डॉ. रणजित ढोले (एम डी होमिओपॅथी)
सध्याच्या जागतिक महामारीच्या काळात अनेकांच्या तोंडी रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी पॉवर) हा शब्दप्रयोग सुरु झाला आणि नुकतीच कोरोना महामारीची तिसरी लाट त्या विषाणूच्या ओमिक्रोन प्रकाराने डोके वर काढू लागली आहे. तेंव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती तंदरुस्त ठेवण्यासाठी होमिओपॅथिक उपचार पद्धती कशी उपयोगी आहे हे समजून घेणे महत्वाचे ठरते.
जर आपल्याजवळ तंदरुस्त रोगप्रतिकारक शक्ती असेल तर आपण कोणत्याही संसर्गजन्य आजाराविरुद्ध चांगल्याप्रकारे लढा देऊ शकतो व तसेच त्या आजाराचे दुष्परिणाम नक्कीच कमी करू शकतो. हे सर्व करण्यासाठी होमिओपॅथिक औषधे जी निसर्ग नियमावरती अवलंबून आहेत त्याचबरोबर पौष्टिक आहार, व्यायाम, व पूर्ण झोप यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
होमिओपॅथिक औषधे ही निसर्ग नियमावरती आधारित असल्यामुळे व ती रोगप्रतिकार शक्तीवर काम करत असल्यामुळे एखादा रोग होऊ नये म्हणून आपण ती घेऊ शकतो. मागील काळात आपण पहिले की पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये होमिओपॅथिक आर्सेनिक अलबम -३० ह्या गोळीने खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि याचीच शासनाने दखल घेऊन ही औषधे प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध करून दिली. त्यामुळे बरेच लोक कोरोना होण्यापासून बचावले. पहिल्या लाटेनंतर लोकांमध्ये आजाराबद्दल प्रचंड दहशत होती आणि त्यावेळेस कोरोना वरील लस पण उपलब्ध नव्हती त्यावेळी होमिओपॅथिक रोग प्रतिबंधात्मक गोळ्या लोकांच्या कामी आल्या.
● महामारी आणि होमिओपॅथीची रोगप्रतिबंधक औषधे ●
२२५ वर्षांपूर्वी होमिओपॅथिक औषध पद्धतीचा शोध लागला आणि तेंव्हापासून आतापर्यंत जेंव्हा जेंव्हा जागतिक महामारी आली तेंव्हा होमिओपॅथिक रोगप्रतिबंधक औषधे लोकप्रिय झाली असे दाखले होमिओपॅथीच्या पुस्तकामध्ये आढळून येतात. याचा प्रत्यय सर्वांना कोरोना महामारीमध्ये आलाच आहे.
अनेक लोक कोरोनाची लागण झाल्यानंतर सुद्धा होमिओपॅथिक औषधे घेतल्यानंतर बरे झाले. तसेच काही लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्या कारणाने तसेच त्यांना इतर जुने आजार असल्यामुळे कोरोनाचा परिणाम तीव्र स्वरूपात आढळून आला. विशेषतः जुन्या ॲलर्जी, श्वसनाचे आजार, डायबेटीस (साखर) व उच्च रक्तदाब अशा प्रकारच्या जुन्या आजारामुळे अनेकांची रोगप्रतिबंधात्मक शक्ती कमजोर होती त्यामुळे त्यांना श्वसनाच्या तीव्र तक्रारी निर्माण झाल्या व त्यांना श्वास घेण्यास अडथळे निर्माण झाले. तेंव्हा तातडीने कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागला व बऱ्याच जणांना ऑक्सिजन पण द्यावा लागला. या परिस्थितीत सुद्धा होमिओपॅथिक औषधे तीव्र स्वरूपाच्या आजारामध्ये उपयोगी पडली व त्यामुळे कोरोना रुग्णांचे अतिदक्षता विभागातील मृत्यूंचे प्रमाण कमी झाले व कोरोना रुग्ण अतिदक्षता विभागातून लवकर बरे होण्यास मदत झाली. तीव्र स्वरूपाच्या आजारामध्ये ॲलोपॅथीक औषोधोपचार सरकारी शिफारसी प्रमाणे मान्य केलेली औषधे देऊन सुद्धा काही रुग्ण उपचारास दाद देत नव्हते तेंव्हा अशा रुग्णांना होमिओपॅथी ही सहायक थेरपी म्हणून मदत झाली. त्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आणि या महामारीच्या काळात होमिओपॅथी ही एक आश्वासक उपचार पद्धती म्हणून समोर आली आहे.
मी स्वतः नोव्हेंबर २०२० पासून अतिदक्षता विभागातील १०० रुग्णांना होमिओपॅथिक औषधे सहायक थेरपी म्हणून दिली अर्थात हे सर्व शक्य झाले ते डॉ. सुनील कारंडे, गणपती हॉस्पिटल पंढरपूर यांच्या सहकार्यामुळे. त्यांनी होमिओपॅथिक औषधावरती विश्वास दाखवला व ज्या रुग्णांना गंभीर स्वरूपाचा कोरोना झाला आहे असे रुग्ण होमिओपॅथिक औषधे ही सहायक थेरीपीसाठी निवडली आणि काही दिवसातच आम्हाला खूप चांगले परिणाम दिसून आले व आम्ही बऱ्याच रुग्णांना जीवनदान देऊ शकलो.
डॉ. रणजित ढोले (एम डी होमिओपॅथी)
माऊली होमिओ क्लिनिक, नवीन बस स्टँड पहिला मजला,पंढरपूर
संपर्क: ८७६६४७६९८५
Comments
Post a Comment